लक्ष्मण चावडी ते एमजीएम रस्त्याची महापौरांसह अधिकारी करणार पाहणी !

Foto

औरंगाबाद :  जालना रोडला पर्यायी रस्ता म्हणून ओळखला जाणारा   लक्ष्मण चावडी ते एमजीएम रस्ता  रुंदीकरणानंतर रस्त्याच्या मधोमध खांब तसेच आहेत. त्यामुळे या रस्त्याचे काम खोळंबलेले आहे. आज महापौर नंदकुमार घोडेले यांनी संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेतली. यानंतर महावितरण, मनपातील विविध विभागाच्या अधिकार्‍यांसह   महापौर नंदकुमार घोडेले हे स्वतः उद्या शनिवारी या रस्त्याची पाहणी करणार आहेत. काही वर्षापूर्वी पुरुषोत्तम भापकर हे मनपा आयुक्त असताना त्यांनी शहरात रस्ता रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली होती. या अंतर्गत अनेक रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून त्यांनी रस्ते मोकळे केले होते. यात लक्ष्मण चावडी ते एमजीएम या रस्त्याचा देखील समावेश होता. 

त्यानंतर  14 कोटी रुपयात या  सुमारे 600 मीटर लांबी असलेल्या रस्त्याचे कंत्राट ठेकेदाराला देण्यात आले. त्यानुसार ठेकेदाराने एमजीएम पासून रस्त्याच्या कामाला प्रारंभ केला. तेथून  पुढे अ‍ॅपेक्स हॉस्पिटलच्या परिसरापर्यंत हे काम करण्यात आले आहेत. परंतु रुंदीकरणानंतर बरेच खांब हे रस्त्याच्या मधोमध आलेले आहेत. रस्त्यातील हे खांब हटविण्याकरिता महावितरणने मनपा प्रशासनाकडे 1 कोटी 40 लाख रुपयांची मागणी केलेली आहे. मनपा प्रशासन जोपर्यंत ही रक्कम महावितरण प्रशासनाला देणार नाही. तोपर्यंत या रस्त्यावरील खांब हटविण्याचे काम महावितरण करणार नाही. अशा परिस्थितीत या रस्त्याचे काम खोळंबलेले असल्याने या प्रश्नी गुरुवारी प्रशांत देसरडा यांनी महापौर घोडेले यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज महापौरांनी संबधित अधिकार्‍यांची बैठक घेत याबाबत माहिती जाणून घेतली. यानंतर बोलताना त्यांनी आपण स्वतः महावितरण व मनपातील अतिक्रमन, नगररचना आदी विभागातील अधिकार्‍यांसह उद्या सकाळी 9 वाजता कैलास नगर ते एमजीएम रस्त्याची पाहणी करणार असल्याचे सांगितले.